Jalachakara
वाफ , द्रव किंवा बर्फ अशा कोणत्याही स्वरूपात पाणी पृथ्वीवर सर्वत्र उपलब्ध आहे . सूर्याच्या उष्णतेमुळे , उच्च तापमानामुळे , पाण्याचे स्थित्यंतर वाफेमध्ये होण्याचे कार्य अखंडपणे चालूच असते . तलाव , नदी , समुद्र अशा कोणत्याही प्रकारच्या उघड्या पाणीसाठ्यामध्ये हे कार्य अविरत सुरू असते . त्याचप्रमाणे , प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये मुरलेल्या पाण्याचे बाष्पीभवनही चालूच असते . या बाष्पीभवनामुळे निर्माण झालेली वाफ हलकी होऊन वरवर जात असते . या सर्व वाफेचे ढग तयार होऊन , ते वातावरणात उंच - उंच जातात . त्यामध्ये सूक्ष्म धुळीचे कण मिसळून निर्माण झालेले ढग उंचावरील वातावरणातील थंड हवेमुळे गोठून पाण्याचे थेंब तयार होतात . हे ढग वाऱ्याबरोबर वाहत असताना डोंगर किंवा उंच पर्वतराजीमुळे अडतात व अधिक उंचावर जातात . एकत्र आलेल्या अशा ढगांचा आकारही वाढतो . त्याबरोबरच सूक्ष्म कणांनी बनलेले पाण्याचे थेंबही आकाराने मोठे व जड होतात आणि शेवटी पावसाच्या रूपाने , पुन्हा जमिनीवर कोसळतात . हे पावसाचे पाणी डोंगरउतारावरून परत वाहत जाऊन त्याचे छोटे ओहळ - ओढ्यांचे स्वरूप घेतात आणि पुढे स्वतःच नदीचे रूप घेतात किंवा नदीला जाऊन मिळतात . काही वेळा तलावरूपाने मध्येच साठून राहू शकतात . दरम्यान हेच पाणी वनस्पती , अन्य प्राणी व मनुष्य यांची तहान भागवीत असते . सर्व वनस्पती जमिनीत मुरलेले पाणी त्यांच्या गरजेनुसार शोषून घेतात व पानांच्या माध्यमातून बाष्पोत्सर्जनाद्वारे वातावरणात सोडले जाते . असे हे अविनाशी चक्र वर्षानुवर्षे चालू असते . जमिनीत शोषलेल्या पाण्याचेही पुन्हा बाष्पीभवन होतच असते व ते यात मिसळते . पृथ्वीवरील पाण्याचे अखंडपणे सुरू असलेले अभिसरण , महासागरावरून वातावरणात जाणाऱ्या , वातावरणातून जमिनीवर येणाऱ्या आणि जमिनीवरून पुन्हा महासागरात जाणाऱ्या पाण्याचे अभिसरण जलस्थित्यंतर चक्र किंवा जलचक्र या संज्ञेने संबोधिले जाते . पाण्याचे पृथ्वीवरील प्रमाण जवळपास स्थिर असले तरी वातावरणातून पाण्याचे रेणू बाहेर पडत असतात किंवा आत येत असतात . पाणी एका साठ्याकडून दुसऱ्या साठ्याकडे बाष्पीभवन , संघनन , अवक्षेपण , अंतापन आणि जमिनीखालील प्रवाह यांसारख्या भौतिक प्रक्रियांद्वारे वाहत असते . जसे नदयांचे पाणी समुद्राला मिळते किंवा समुद्रातील पाणी वाफेच्या स्वरूपात वातावरणात मिसळते . हे घडत असताना पाणी स्थायू , द्रव , वायू या तीनही अवस्थांमधून रूपांतरित होते . जमिनीवर पडणाऱ्या पाण्यापैकी एक - तृतीयांश पाणी महासागराकडे पृष्ठीय अथवा अध : पृष्ठीय जल प्रवाहातून परत जाते . उरलेले दोन तृतीयांश पाणी बाष्पीभवनामुळे व वनस्पतीच्या बाष्पोच्छ्वासामुळे पुन्हा वातावरणात प्रवेश करते . असे स्थूलमानाने पाण्याचे स्थित्यंतर चक्र सतत चालू असते .
Comments
Post a Comment